क्राईमताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

कोलकत्ता येथील घटनेचे निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन

फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

मुंबई /प्रज्ञावंत वृत्तसेवा : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेध म्हणून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे. या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. हे ‘काम बंद आंदोलन’ मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.

शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर हा त्या ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्याशिवाय रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालूच शकत नाही, याची कल्पना सरकारला आणि प्रशासनाला व्यवस्थित आहे तरीही त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत असते. ज्या ठिकाणी निवासी डॉक्टर काम करतात त्या ठिकाणचे काम बंद असल्याने याचा रुग्णांना मोठा फटका बसू शकतो. राज्यभरातून मुंबई महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात.

 

वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नियोजित शस्त्रकिया रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे तसेच नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. तसेच काही रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल अशा रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे तसेच सर्व अध्यापक वर्गाला बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्ण दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

या रुग्णालयांना बसणार फटका

 

जे. जे. समूह रुग्णालये (जी टी, कामा आणि सेंट जॉर्जेस) 

केइएम रुग्णालय 

सायन रुग्णालय 

नायर रुग्णालय 

कूपर रुग्णालय

आमची संघटना निवासी डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे देशातील एखाद्या निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली गेली असेल तर त्याचा निषेध करणे गरजेचे आहे. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक असावेत, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे.- डॉ प्रतीक देबाजे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड असे यांनी सांगितले

 

 

काय आहेत मागण्या?

 

केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.

तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.

वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.

रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी, पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.इत्यादी मागण्या आहेत.

 

 

शुक्रवारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर कोलकातामध्ये खळबळ उडाली आहे. शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका 31 वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर गुरुवारी रात्री लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. चेस्ट मेडिसिन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये अधिकाऱ्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या.

 

 

महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, जर पोलिसांनी रविवारपर्यंत या प्रकरणाची उकल केली नाही तर ते हे प्रकरण सीबीआयकडे सोपवतील.

 

 

दुसरीकडे, आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिल्याची टीका करत तातडीनं कारवाईची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. न्यायालयीन चौकशी, दोषींना फाशीची शिक्षा, पीडितेच्या कुटुंबीयांना पुरेशी भरपाई आणि रुग्णालयांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या तीन जनहित याचिका कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश टीएस शिवग्ननम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.