ताज्या घडामोडीराजकीयसामाजीक

कागलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या वतीने राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा व रिपाइंच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

रिपाइं च हे कार्यालय सर्वांच्या न्याय्य हक्काचे घर असेल - अच्युत माने 

आमचे सर्व अपडेट व्हाटसअप वर मिळवा

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा(दि.२६ जून):

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कागल तालुक्याच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा व कागल तालुका रिपब्लिकन पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अच्युक्त माने यांच्या मंगल हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते. प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या मंगलहस्ते वंदन करण्यात आले.त्यानंतर नूतन कार्यालयाचे उद्घाटन अच्युत माने यांनी फीत कापून केले. या उद्घाटनानंतर कार्यक्रमाचे रूपांतर संवाद सभेत झाले. यावेळी उद्घाटन पर मनोगतात अच्युत माने म्हणाले की, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी कार्यालय हवं असतं आणि उत्तमदादांच्या मार्गदर्शनातून ते कागलमध्ये उभा राहत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.कारण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा झाडाखाली, एखाद्या चहाच्या गाड्यावर, सीपीआरमध्ये बसून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले परंतु तो कार्यकर्ता आज एवढा सक्षम झाला आहे की, त्यांनी पक्षाचं कार्यालय उभा केलं हा चळवळीचा विजय आहे. आणि ते शाहू राजांच्या सामाजिक समतेच्या विचारातून त्यांच्याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने होत असल्यामुळे याला अजूनही मोठी गती येईल. कारण याच कार्यालयाच्या माध्यमातून आपण संघर्ष करून आणि सर्वसामान्य बहुजनांचे प्रश्न सोडवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचे कार्य करू शकतो. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समीक्षक, लेखक डॉ.अमर कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात मानवतेच्या कल्याणाचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. समान न्याय देण्यासाठी न मागता इथल्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन दिनदलित बहुजनातील जातींना आरक्षण देऊन त्यांची प्रगती साधण्याचे लोकांचे काम या शाहू राजांनी केल्यामुळे ते लोकराजा ठरले असल्याचे सांगितले. आंबेडकरी विचारवंत डॉ.कपिल राजहंस म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्यांचे नाहीत तर भारताचे पुढारी होतील हेच विधान योग्य आहे आणि ते विधान छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं आणि ते भविष्य खरं ठरलं. ही शाहू राजांची दूरदृष्टी आपल्याला समजते याशिवाय सामाजिक समतेचा विचार घेत असताना क्रांतीबा ज्योतिबांनी पेटवलेली समतेची क्रांतीची ज्योत ही स्वतः प्रज्वलीत करून बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात देऊन समतेचा प्रकाश निर्माण करण्याची कामगिरी शाहू राजांनी केली असल्याचे सांगितले.तर विजय काळे म्हणाले की,शाहू राजा हा फक्त सामाजिक समतेचा विषय नाही तर सामाजिक समता येण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून इथला प्रत्येक माणूस जागरूक राहिला पाहिजे आणि त्या जागरूकतेतून त्यांना मानवतेचं कल्याण काय आहे हे जाणून खऱ्या खोट्याची जाणीव करून देणार तो राजा होता. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उत्तमदादा कांबळे म्हणाले की,

झाडाखाली, एखाद्या हॉटेलमध्ये, एसटी स्टँडच्या लगत असणाऱ्या जागेवर. एखाद्या बागेत आम्ही एखाद्याला न्याय देण्याच्या भूमिकेत असायचो, अनेक जण हेटाळनी करायचे परंतु आज स्वाभिमानाच्या चळवळीने आमच्यामध्ये इतकं आत्मभान आलं की आज आम्ही हे कार्यालय उभा करू शकलो. आरपीआयची चळवळ गतिमान करण्यासाठी हे कार्यालय असेलच.पण जे जे दुःख घेऊन येतील त्यांच्या चेहऱ्यावरती सुख आणण्याचे काम या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने करू. कारण शाहूंच्या जयंतीनिमित्त त्यांचाच विचार घेऊन या कार्यालयाची सुरुवात ही शाहू राजांनी इथल्या दीनदुबळ्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणलं त्याचं रोपटं हे कार्यालय आहे असं म्हणूनच आम्ही काम करू.याशिवाय आजच्या काळात प्रसारमाध्यमांनी अनेक विचार मारले परंतु काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून चांगले विचार आले आणि म्हणून आपण आता चांगल्या विचारांपासून वेगळे होता कामा नये ही आपली भूमिका या काळात ठेवली पाहिजे असे सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, बौद्ध महासभेचे अनिल सिद्धेश्वर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे स्वागत कागल तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर यांनी प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बी. आर.कांबळे यांनी तर निवेदन वैभव प्रधान यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, कायदेविषयक सल्लागार एड. राहुल सडोलीकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, प्रदीप मस्के, तानाजी कांबळे, नामदेवराव कांबळे,अविनाश अंबपकर, सचिन मोहिते, अण्णासो आवळे, साताप्पा आनुरकर,सुभाष कांबळे,अतुल सडोलीकर, निशिकांत कांबळे,तानाजी सोनाळकर,नामदेव केनवडेकर,सातापा हेगडे,सचिन चिखलीकर,जयवंत हळदीकर,एम.डी.कांबळे,दिलीप शेंडूरकर,मंजुनाथ वराळे,प्रल्हाद कांबळे, बाजीराव हंचनाळकर,कुणाल कांबळे. योगेश आजाटे, प्रज्योत सूर्यवंशी, अमर साजणीकर, मंजुनाथ वराळे, उदय कांबळे, उत्तम साकेकर, सतीश कांबळे, अभिजीत कोगले, एन.एम. कांबळे, दिनकर कांबळे यासहित असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नूतन कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगी उत्तमदादांचा सन्मान अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.